मुंबई : बँकेत वारंवार जाऊन पैसै काढणाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता सरकारनं बँकेत पैसे काढल्यावर बोटावर निवडणुकीप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेताय.
पैशांची अदलाबदल करतानाही बोटांवर शाई लावण्यात येणार आहे. आज वित्तसचिव शक्तीकांता दास यांनी एका पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
शिवाय दोन हजाराच्या नव्या नोटांचा रंग जाण्याच्या बातमीवरही आज दास यांनी स्पष्टीकरण दिलं. ज्या नोटेचा रंग जातो तीच खरी नोट अन्यथा ती नोट खोटी असल्याचं मानावं, असंही दास यांनी म्हटलंय.
गुरुनानाक जयंतीच्या सुट्टीनंतर आज बँका सुरू झाल्या आहेत. बँकांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन आजपासून बँकेत चार रांगा करण्यात येत आहेत. त्यात वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी वेगळी रांग आहे. याशिवाय पैसे अदला-बदली करणे, पैसे खात्यात जमा करणे आणि पैसे खात्यातून काढणे यासाठीही वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे.
त्याचप्रमाणे आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आजपासून आठवड्याला २४ हजार रुपये काढता येणार आहेत. याशिवाय पाचशे रुपयांच्या जवळपास ५० लाख नोटा देशभरात वितरीत करण्यात आल्या आहेत. त्या देखील आज पासून बँकांमध्ये आणि काही एटीएमद्वारे मिळणार आहेत. या उपाययोजनांमुळे ग्राहकांचा मनस्ताप काही प्रमाणात कमी होईल अशी शक्यता आहे.