नवी दिल्ली, मुंबई : पुन्हा महागाईला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. डाळी, भाज्या आणि फळं महागली आहेत. अन्न-वस्त्र आणि निवारा यावर चहुबाजूंनी महागाईने हल्ला केलाय.
येत्या काळात महागाईचा भडका उडणार असं चित्र दिसतंय. कारण मे महिन्यामध्ये महागाई ५.०१ टक्क्यांनी वाढलीय. डाळी, भाज्या आणि फळांच्या दरात मोठी वाढ झालीय. त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतोय. मे महिन्यात १६.६२ टक्क्यांनी डाळी महागल्यायत.
२०१४-२०१५ मध्ये जवळपास २ अब्ज टन डाळींचं उत्पादन कमी झालंय. गेल्या वर्षांतील डाळींचा हंगाम विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये अडकल्यामुळे यावर्षी डाळींचं उत्पादन घटणार असून डाळींचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकार ६० ते ७० लाख टन डाळींची आयात करणार आहे. याचा थेट परिणाम म्हणजे डाळींची दरवाढ अटळ आहे.
तर मे महिन्यात भाजीपालाच्या दरात ४.६४ टक्के वाढ झालीय. तर फळं ३.६४ टक्के महागलेत. तर दूध आणि दूग्धजन्य पदार्थ ७.४३ टक्क्यांनी महाग झालेत. तर मांसाहारी पदार्थ ५.४३ टक्क्यांनी महागलेत. मसाल्याच्या दरात ८.८२ टक्के वाढ झालीय. तेल १.९३ टक्क्यांनी वधारलंय. अन्न-वस्त्र आणि निवारा महागल्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल होणार आहेत.
गेल्या दोन वर्षातल्या पावसाच्या अनियमीततेमुळे यावर्षी कडधान्य आणि डाळीचं उत्पन्न कमी झालंय. याचा परिणाम म्हणून यावर्षी डाळीच्या किंमतीत २५ टकके वाढ झाल्याचं चित्र आहे. यावर्षी पाऊस कमी झाला तर मात्र मोठ्या प्रमाणात डाळ आयात करावी लागणार आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये डाळीचे सध्याचे भाव गगणाला भिडलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.