नवी दिल्ली : भारतीय भाषांना महत्त्व देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. भारतीय चलनाच्या कागदी नोटांवर आता २२ भारतीय भाषांना प्रतिनिधित्व मिळणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार संविधानाच्या आठव्या सूचीतील सर्व भाषांना चलनी नोटांवर प्रतिनिधित्व देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता मणिपुरी, संथाली, डोगरी, बोडो आणि मैथिली भाषांचा आता नोटांवर समावेश होणार आहे.
सध्या या नोटांच्या मागील बाजूस १७ भारतीय भाषा आहेत. २००४ साली वर उल्लेखलेल्या भाषांचा संविधानाच्या आठव्या सूचीत समावेश करण्यात आला खरा, पण या भाषांना चलनी नोटांवर मात्र स्थान मिळू शकले नाही. पंतप्रधान कार्यालयाने मात्र रिझर्व्ह बँकेच्या मुद्रा छपाई विभागाला संबंधित आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार मैथिली भाषा आणि तिच्या लिपी कैथी किंवा तिरहुता समृद्ध आहेत. पण, आता ही समृद्धी लोकांसमोर मोठ्या प्रमाणावर आणणे गरजेचे आहे. आता इतक्या भाषा नोटांवर सामावल्या जाण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सध्या असलेल्या भाषांच्या आकारमानात बदल करावे लागणार आहे.