नवी दिल्ली : उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तान हद्दीत घुसला आहे.
या जवानाला परत आणण्यासाठी भारताकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. या संदर्भात पाकिस्तान लष्करी अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे.
या संदर्भात आज सुरू असलेल्या मंत्रिमंडळाची सुरक्षा विषयक समितीची बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे.
धुळ्यातला एक जवान बेपत्ता असल्याचं समोर आलंय. चंदू चव्हाण असं या जवानाचं नाव आहे. काल त्यांच्या कुटुंबियांना चंदू बेपत्ता असल्याचा फोन आला. चंदू 22 तारखेला धुळ्यात सुट्टीसाठी येणार होता. मात्र त्याची सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचं समजतंय.
चंदू चव्हाण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असून,त्यानं अनावधानानं नियंत्रण रेषा पार केल्याचं स्पष्टीकरण लष्कराच्या वतीनं देण्यात आलंय. त्याचा कोणताही संपर्क होत नाही आहे.
दरम्यान तो सर्जिकल स्ट्राइक ऑपरेशन मधला जवान नसल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलंय.