नवी दिल्ली : आत्तापर्यंत शांततेच्या मार्गानं दहशतवादाचा प्रश्न हाताळणाऱ्या भारतानं आता मात्र पूँछ आणि उरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना जशास तसं प्रत्यूत्तर देण्याचा निर्णय घेतलाय.
भारतीय फौजेनं बुधवारी रात्री उशिरा नियंत्रण रेषेला पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' केलं. डीजीएमओ आणि परदेश मंत्रालयानं घेतलेल्या संयुक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती देण्यात आलीय.
'सर्जिकल स्ट्राईक' ऑपरेशनमध्ये भारताचे पॅराकमांडोजनं अवघ्या चार तासांत ४० दहशतवाद्यांना पाणी पाजलं. या ऑपरेशनसाठी भारतानं आपल्या सर्वोत्तम कमांडोजची निवड केली होती. या ऑपरेशनमध्ये सगळे भारतीय कमांडोज सुखरुप भारतात परतलेत.
भारतीय सेनेनं भिंबेर, केल, लीपा आणि टट्टापनीजवळ असलेल्या लॉन्च पॅडसला आपल्या निशाण्यावर घेतलं. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, एनएसए अजित डोभाल, सेना प्रमुख आणि डीजीएओनं संपूर्ण रात्रभर सर्जिकल ऑपरेशन मॉनिटर केलं.
या सर्जिकल स्ट्राईकची माहिती भारतीय सेनेनं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनाही देण्यात आली होती.