नौदलाचे विमान कोसळून ५ ठार

भारतीय हवाई दलाचे अमेरिकन बनावटीचे ‘सी- १३0 जे’ हे ‘सुपर हक्यरुलस’ मालवाहू विमान शुक्रवारी ग्वाल्हेरजवळ कोसळले. या अपघातात चार अधिकार्‍यांसह चालक दलातील पाचही जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 29, 2014, 07:36 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
भारतीय हवाई दलाचे अमेरिकन बनावटीचे ‘सी- १३० जे’ हे ‘सुपर हक्यरुलस’ मालवाहू विमान शुक्रवारी ग्वाल्हेरजवळ कोसळले. या अपघातात चार अधिकार्‍यांसह चालक दलातील पाचही जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही.
भारतीय हवाई दलात हे विमान नव्याने दाखल करण्यात आले होते. नौदलातील गेल्या काही महिन्यांतील अपघातांच्या घटनांनंतर ‘सुपर हक्यरुलस’ विमान अपघातग्रस्त होणे, हा लष्करासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नौदलाच्या ताफ्यातील पाणबुड्या व फ्रिगेटना वारंवार झालेल्या अपघातांनंतर नौदलप्रमुख जोशी यांनी राजीनामा दिला होता.
या अपघातात विंग कमांडर प्रशांत जोशी (पुणे), विंग कमांडर आर. नायर, स्क्वाड्रन लीडर कौशिक मिश्रा, स्क्वाड्रन लीडर आशिष यादव (नेव्हीगेटर) आणि वॉरंट ऑफिसर कृष्ण पाल सिंह (फ्लाइट इंजिनीअर) मृत्युमुखी पडले.
‘सी- १३० जे’ या विमानाने शुक्रवारी सकाळी १०वाजता आग्रा येथील लष्करी तळावरून उड्डाण केले होते. मात्र ग्वाल्हेर हवाईतळापासून पश्‍चिमेस ११५ किमी अंतरावर ते कोसळले, अशी माहिती दिल्लीत हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिली. अपघातस्थळ राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे.
विंग कमांडर प्रशांत जोशी हे पुण्याचे असून त्यांच्या घराण्यातच हवाईदलात सेवेची परंपरा आहे. त्यांचे वडील अशोक जोशी ग्रुप कॅप्टन होते तर सासरे आपटे हे विंग कमांडर होते. पत्नी अनिता या देखील आधी हवाई दलामध्ये पायलट होत्या. प्रत्येक विमानासाठी सुमारे ९६५ कोटी रुपये मोजण्यात आले होते. अमेरिकेकडून खरेदी केलेल्या सहा विमानांच्या ताफ्यातील नियमित प्रशिक्षण मोहिमेतील हे एक विमान होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.