डेहराडून : 'या निवडणुकीत मी निष्पक्ष आहे', असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे, तसेच 'यावेळी निकाल अनपेक्षित असतील', अशी देखील भविष्यवाणी बाबा रामदेव यांनी केली आहे.
उत्तराखंड विधानसभेसाठी आज मतदान होत असतानाच योगगुरु बाबा रामदेव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
हरिद्वारमध्येही बोलताना बाबा रामदेव म्हणाले, 'या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होईल', विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाबा रामदेव यांनी यावेळी भाजपचं नाव घेतलं नाही. 'मतदानादरम्यान मला कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घ्यायचं नाही,' असं देखील यावेळी बाबा रामदेव म्हणाले.
तसेच 'देशाची जनता हुशार आहे. ती स्वत:च निर्णय घेईल', असं ते म्हणाले. त्याआधी रामदेव बाबांनी सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. ज्यांची नियत चांगली त्यांना मत द्या, असं देखील बाबा रामदेव यावेळी म्हणाले.