तहलका : `जे काही झालं ते सर्व काही मुलीच्या मर्जीनुसारच...’

सहकारी तरुणीच्या लैंगिक शोषण प्रकरणी ‘तहलका’चे ‘एडिटर इन चीफ’ तरुण तेजपाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळलीय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 26, 2013, 05:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सहकारी तरुणीच्या लैंगिक शोषण प्रकरणी ‘तहलका’चे ‘एडिटर इन चीफ’ तरुण तेजपाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळलीय. दरम्यान, पीडित मुलीच्या जबाबानंतर तेजपाल यांना अटक होण्याची शक्यता आहे. तेजपाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला होता. दरम्यान, तरूण तेजपाल यांच्यासोबत तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनाही अटक करण्याची मागणी गोवा महिला आयोगाने केलीय. शोमा चौधरी यांनी तेजपाल यांना पाठीशी घालत प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचं गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या सेठ यांचं म्हणणं आहे.
‘जे काही झालं ते सर्व काही मुलीच्या मर्जीनुसारच...’
‘जे काही झालं ते सर्व काही मुलीच्या मर्जीनुसारच झालं होतं’ असं तेजपालनं अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेल्या अर्जात म्हटलं होतं. ‘थिंक फेस्ट कार्यक्रमाच्या निमित्ताने गोव्यात असताना जे काही घडले ते सारे काही मजे-मजेत घडलं’ असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, कोर्टाने गोवा पोलिसांकडे आतापर्यंत केलेल्या चौकशीचा अहवाल मागितला आहे.
‘तहलका’चं मुंबईतील कार्यालय बंद
तरुण तेजपालवर लैंगिक छळाचा आरोप करणारी महिला पत्रकार तहलकाच्या मुंबई कार्यालयात काम करत होती. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर तहलकाचं मुंबईतील कार्यालय बंद आढळंय. इतकंच नव्हे तर कंपनीच्या स्टिकर जागेवरून हटवून लपवून ठेवण्यात आलंय.
‘तहलका’च्या वरीष्ठ संपादकांचा राजीनामा
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानं तरुण तेजपाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिलाय. त्यातच ‘तहलका’चे वरीष्ठ संपादक राणा अयूब यांनी मात्र आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
पीडित तरुणीनंही दिला राजीनामा
तरुण तेजपाल याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर पीडित तरुणीनं आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. गोवा पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधलाय. लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार मुलीने जबाब नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. गोव्यात जाऊन हा जबाब नोंदवायला ती तयार असल्याचं गोवा पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटल्याचं पीटीआयने म्हटलंय. या प्रकरणाच्या तपास अधिकारी सुनीता सावंत यांनी काल या मुलीशी फोनवरून बातचीत केलीय. त्यानुसार ती मुलगी जबाब नोंदवण्यात तयार झाल्याचं वृत्त आहे. तपास अधिकारी सावंत आणि त्या मुलीत झालेल्या पहिल्या फोन कॉलमध्ये तिने अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी सांगितल्या आहेत. या घडामोडींचा उल्लेख प्रत्यक्ष त्या मेलमध्येही नव्हता.
मुंबई पोलिसही करणार सहकार्य
दरम्यान, गोवा पोलिसांनी या प्रकरणी संपर्क साधल्यास त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल असं मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी म्हटलंय. ही मुलगी मुंबईची आहे. त्यामुळे तिनं संरक्षण मागितल्यास तेदेखील पुरवलं जाईल असंही सिंह म्हणाले...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.