अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे पोलीस आता महिलांना ‘नैतिकतेचे पाठ’ शिकवताना दिसतायत... गुजरातच्या पोरबंदर पोलिसांनी एक पोस्टर जाहीर करून त्यामध्ये तरुणींना जीन्स न परिधान करण्याचं आवाहन केलंय.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांनी जाहीर केलेल्या या नव्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. धक्कादायक म्हणजे, हे पोस्टर महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत तयार करण्यात आलंय... आणि यामध्ये महिलांनी अंगभर कपडे घालण्याची सूचना केली गेलीय.
आत्तापर्यंत, मुलींच्या पेहरावावर केवळ खाप पंचायती आणि कट्टरपंथियांकडूनच असे ‘फतवे’ जाहीर केल्याचं दिसत होतं. परंतु, पहिल्यांदाच पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या आवाहनात मुलींच्या कपड्यांबद्दल भाष्य केलं गेलंय. यामध्ये, मुलींनी आणि महिलांनी जीन्स आणि शॉर्टस न घालण्याच्या सूचना दिल्या गेल्यात.
गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा ताबा घेतल्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळलीय. पण, या पोस्टर प्रकरणामुळे एका महिला मुख्यमंत्र्याच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.