www.24taas.com, नवी दिल्ली
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेल्या बाबा रामदेव यांनी आता आपण सोमवारी सकाळी रणनीती जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. आज सकाळीही त्यांनी पंतप्रधानांना संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता पण केंद्र सरकारपैकी कुणीही त्यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
आज (रविवारी) सकाळी आक्रमक पवित्रा घेत संध्याकाळपर्यंत कारवाई न झाल्यास जनक्रांतीचा नारा त्यांनी दिला होता. मात्र, पंतप्रधानांना मागण्या योग्य वाटतायेत, मात्र त्यावर कारवाईस ते तयार नसल्याचं त्यांनी संध्याकाळी म्हटलंय. सरकारविरोधातील आंदोलन संपणार नाही हे स्पष्ट करतानाच, जेलभरो आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय. पहिल्या दिवशी कारवाईसाठी त्यांनी सरकारला तीन दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही याबाबत पत्र लिहिलं होतं.
‘सरकारच लोकांचे अधिकार लुटून नेतंय, केंद्र सरकारनं देश लिलावात काढलाय... सरकारनं सत्तेत राहण्याचा अधिकार गमावलाय` अशा शब्दांत बाबा रामदेवांनी सरकारवर टीका केलीय. पंतप्रधानांना दिलेली मुदत उलटून गेल्यावर ते रामलीला मैदानात त्यांच्या समर्थकांसमोर बोलत होते.