नवी दिल्ली : अमेरिकतून आलेल्या रिपोर्टनंतर भारतासमोर इसिसचं संकट किती गंभीर आहे, याची दखल आता सरकारनं घेतलेली आहे. यासंदर्भात केंद्राला मिळालेल्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांनी शनिवारी दिल्लीत काही राज्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. इसिसचा संभाव्य धोका हाताळण्यास सज्ज राहण्यासाठीच्या उपायांची त्यात चर्चा झाली.
तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत तरुणांना इसिससारख्या संघटनांच्या विचारसरणीकडे आकर्षित होण्यापासून कसं रोखता येईल, यावर गांभीर्यानं विचारविनिमय झाला. कुठल्याही धर्माच्या कट्टरपंथी तत्त्वांकडे तरुणांनी झुकणं हा देशासाठी चिंतेचा विषय आहे आणि हा प्रश्न हाताळण्यासाठी एक निश्चित रूपरेषा आखण्याची गरज आहे, असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय.
देशभरात इसिसच्या विचारसरणीनं प्रभावित सुमारे २५ युवकांची ओळख पटली असून, हे युवक या दहशतवादी गटात सामील होण्यास इच्छुक आहेत.
काही राज्यांमध्ये तरुण कट्टरपंथाच्या मार्गाला लागल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. अशा युवकांना समुपदेशनाच्या माध्यमानं समजूत काढून दहशतवादाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.
अलीकडेच तेलंगणामधील १७ तरुणांना सीरियात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. महाराष्ट्रातही चार तरुण पश्चिम आशियात जाण्याच्या तयारीत होते. त्यांना थांबविण्यात आलं. यापैकी कुणालाही अटक करण्यात आली नसली तर त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली आहे.
दिल्लीतील या बैठकीला जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, आसाम, पंजाब, पश्चिम बंगाल आणि राजधानी दिल्लीतील अधिकारी सहभागी झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.