नवी दिल्ली : विमान कंपनी गोएअरने प्रवाशांसाठी स्वस्तात मस्त विमान प्रवासाची ऑफर आणलीये. या योजनेंतर्गत तुम्ही अवघ्या ६०१ रुपयांत देशांतर्गत विमान प्रवास करु शकता.
३१ जानेवारीपर्यंत या प्रवासासाठी बुकिंग करण्याची सुविधा आहे. २५ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत तुम्ही या ऑफरअंतर्गत प्रवास करु शकता. याआधी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्पाईस जेटने ८२६ रुपयांत देशांतर्गत विमान प्रवासाची ऑफर दिली होती. एअरलाईन्स सेक्टरमधील तज्ञांनुसार, फेब्रुवारी आणि मार्च यादरम्यान या क्षेत्रात मंदी असते. यामुळे विमान कंपन्या तिकीटावर अशी सवलत देतात.
दरम्यान, गोएअरने देशांतर्गत विमान प्रवासाची किंमत अवघी ६०१ रुपये म्हटली असली तरी त्यावरील टॅक्स मिळून तिकीटाची किंमत अधिक होऊ शकते. उदाहरणार्थ तुम्हाला मुंबई ते गोवा असा प्रवास करायचा असल्यास वेब एअरची किंमत ५९७ रुपये आहे मात्र त्यावर एक हजार २९७ रुपये टॅक्स लागेल. म्हणजेच एकूण तिकीटाची किंमत एक हजार ८९४ रुपये होईल.