मुंबई : 'टीपू सुल्तान हिंदू असते तर आज त्यांनाही तेवढाच मान-सन्मान मिळाला असता जेवढा आज शिवाजी महाराजांना मिळतोय' असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीष कर्नाड यांनी केलंय. यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. दरम्यान, वादंगानंतर कर्नाड यांनी आपल्या विधानाबद्दल माफीही मागितलीय.
अधिक वाचा - तुम्हाला टीपू सुलतानबद्दल 8 या गोष्टी माहीत आहेत का?
त्याचबरोबर बंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळालाही केम्पेगौडा यांच्या ऐवजी टीपू सुल्तान यांचं नाव देणं जास्त योग्य झालं असतं... कारण केम्पेगौडा हे काही टीपू सुलतानप्रमाणे स्वातंत्र्यसेनानी नव्हते, असंही कर्नाड यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं आयोजित केलेल्या टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्तच्या कार्यक्रमात कर्नाड यांनी हे विधानं केलं. 'टीपू सुलतान मुसलमानच्या ऐवजी हिंदू असते तर त्यांना तोच दर्जा दिला गेला असता जो आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना मिळतोय. आजच्या काळात विद्वान आणि राजनेत्यांची नजर सर्वात अगोदर एखाद्याच्या जातीवर आणि धर्मावर जातेय. असं मूल्यांकन केल्यामुळे टीपू सुलतान यांच्यावर अन्याय झालाय' असंही कर्नाड यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी टीपूला हिंदूविरोधी आणि कन्नड विरोधी म्हणणाऱ्यांवरही निशाणा साधला.
टीपू सुलतान आणि शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे कर्नाटकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कर्नाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला चपलांचा हार घातला. तर विश्व हिंदू परिषदेनंही कर्नाड यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलंय.
वादंग झाल्यानंतर गिरीश कर्नाड यांनी एक निवेदन जाहीर करून हे आपले व्यक्तिगत विचार असल्याचं म्हटलंय. कोणालीह दुखावण्याचा त्यात हेतू नव्हता. जर या वक्तव्यांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण त्यांची माफी मागतो असं कर्नाड यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.