www.24taas.com , झी मीडिया, रांची
चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.
या खटल्याची सुनावणी १७ सप्टेंबरलाच पूर्ण झालीय़. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणात लालू प्रसाद दोषी आढळल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. त्यामुळं आजचा फैसला लालूंच्या राजकीय भवितव्यासाठी महत्तवाचा आहे.
लालूप्रसाद यादव यांच्यासह बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्राही या प्रकरणात आरोपी आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यासह एकूण ४५ जणांविरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. ३७.७० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा कोर्टानं सुनावल्यास दोषी आमदार, खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं नुकताच दिला आहे. त्यामुळं सीबीआय कोर्टाच्या निकालाकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चारा घोटाळाप्रकरणी १९९६ मध्ये एफआयआर दाखल झाली होती. १७ वर्षानंतर याप्रकरणाचा निकाल लागणार आहे. कोर्टाच्या निकालासाठी लालू प्रसाद यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यासहीतर इतर बहुतेक आरोपी कालच रांचीत दाखल झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.