अहमदाबाद : केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.
बोडकदेव येथील एका पान पार्लरमध्ये ही 2000ची नकली नोट आढळलीये. य़ाआधी 2000च्या फोटोकॉपी असलेल्या खोट्या नोटा आढळल्या होत्या. मात्र या फेक नोटेत गांधींच्या फोटोवर इलेक्ट्रोटाइप (2000)चा वॉटरमार्कही आहे.
जजेस बंगला रोड येथे वंश बरोत यांचे पान आणि सोडा शॉप आहे. वंश यांच्या दुकानात एका व्यक्तीने 2000 रुपयांची नोट देऊन काही वस्तू खरेदी केल्या. मात्र जेव्हा वंश ही नोट घेऊन जवळच्या बँकेत गेले तेव्हा ही नोट फेक असल्याचे सांगत बँक कर्मचाऱ्यांनी ती घेण्यास नकार दिला.
जेव्हा मला ग्राहकाने ही नोट दिली तेव्हा ती नकली नोट असल्याचे मला समजले नाही. मात्र जेव्हा बारकाईने पाहिले असता खऱ्या नोटेच्या तुलनेत ही नोट मला लहान दिसली. त्याचवेळी मला नोट खोटी असल्याचा संशय आला. त्यामुळे मी जवळच्या बँकेत गेलो तेव्हा बँक मॅनेजरनी ती नोट खोटे असल्याचे सांगितले. मी ही नोट अर्जासह आरबीआयकडे देणार आहे, असे वंश बरोत यांनी सांगितले.