www.24taas.com, नवी दिल्ली
हिवाळी अधिवेशन सुरू होताच पहिला दिवस गोंधळामुळेच गाजला. ममतांची अविश्वास प्रस्तावाची तयारी पुरती फसली. पण भाजपनं ‘एफडीआय’वर नियम १८४ नुसार चर्चेची मागणी लावून धरली. सरकार ही मागणी मान्य करायला तयार नाही. आता प्रश्न आहे... हा पेच सुटणार कसा आणि असाच गोंधळ आणखी किती दिवस चालणार?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सगळी स्क्रिप्ट तयार होती. सुरुवात कशी होणार तेही ठरलं होतं... उत्सुकता होती ती पहिला दिवस कसा गाजणार त्याची... ममतांनी ‘एफडीआय’ विरोधात अविश्वास ठराव आणण्याची पूर्ण तयारी केली होती. पण ममतांचं प्लॅनिंग पुरतं फसलं. प्रस्तावासाठी आवश्यक असणारं ५३ खासदारांचं समर्थन तृणमूलकडे नव्हतं. अर्थातच ममता एकट्या पडल्या. मग भाजपनं नियम १८४ नुसार ‘एफडीआय’वर चर्चेची मागणी केली. याच मुद्द्यावरुन दिवसभरात लोकसभा चार वेळा स्थगित झाली तर दोन वेळा राज्यसभा स्थगित झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळातच गेला, सरकारनं याचं खापर विरोधकांच्या डोक्यावर फोडलंय.
नियम १८४ नुसार ‘एफडीआय’वर चर्चा झाली तर मतदान घेणं शक्य आहे, त्यामुळे भाजपला १८४ नुसार चर्चा हवी आहे तर इतर कुठल्याही मार्गानं चर्चा घ्या, नियम १८४ चा अट्टाहास कशासाठी, असं सरकारचं म्हणणं आहे. ‘एफडीआय’वरुन राजकारणाला जोर चढलाय. सरकारला ‘एफडीआय’वर चर्चा हवी आहे पण मतदान नको... मतदान झालंच तर मुलायम आणि मायावती कुणाच्या बाजूनं जाणार, याची सरकारला धास्ती आहे. तर भाजप मात्र मतदानासाठी आग्रही आहे. जोपर्यंत हा पेच कायम राहील, तोपर्यंत तरी संसदेत गोंधळच सुरू राहण्याची शक्यताच जास्त दिसतेय.