अहमदाबाद : अहमदाबादमधील प्रसिद्ध रेडियो जॉकी कुणाल देसाई यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे. भूमी पांचाल असं तिचं नाव आहे. अहमदाबादमधल्या सचिन टॉवर या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन भूमीनं उडी मारली. दोनच महिन्यांपूर्वी भूमी आणि कुणालचं लग्न झालं होतं. आत्महत्येपूर्वी भूमीनं आपल्या एका मित्राला एसएमएस पाठवला होता. ज्यात तिनं आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.
दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भूमीच्या कुटुंबियांनी केलाय. ज्या इमारतीवरून भूमीनं उडी मारून आत्महत्या केली तिकडे तिच्या ओळखीचं कोणीच राहत नव्हतं. त्यामुळे ती तिकडे गेलीच कशी असा प्रश्न भूमीच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.
24 नोव्हेंबरला या दोघांचं लग्न झालं, आणि त्यानंतर ते थायलंडला हनीमूनला गेले, तिकडे या दोघांमध्ये वाद झाले, पण या वादाचं नेमकं कारण कुटुंबियांना माहिती नाही. या वादानंतर भूमी आपल्या माहेरीच राहायला आली. दुबईमधली एक स्पर्धा जिंकल्यानंतर भूमी आणि कुणाल यांची ओळख झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, त्यानंतर या दोघांनी लग्न केलं.