लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या राजकारणासाठी आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे. सपासाठी आजचा दिवस सुपर सॅटर्डे ठरणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या शक्तीप्रदर्शनाचा हा दिवस आहे.
दोघांनीही वेगवेगळ्या बैठका बोलावल्या आहेत. अखिलेश यादव यांनी सकाळी 9 च्या सुमारास आमदारांची बैठक बोलावलीय. तर मुलायमसिंह यादव यांनी अधिकृतरित्या जाहीर केलेल्या 393 उमेदवारांची बैठक बोलावलीय. ही बैठक सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे. सा-यांच्या नजरा या बैठकांवर असणार आहे.
कारण मुलायमसिंह यांनी जाहीर केलेल्या यादीतील उमेदवार अखिलेश यांच्या यादीतही आहेत. त्यामुळे हे उमेदवार या बैठकीत सामील होणार का याकडे नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि महासचिव रामगोपाल यादव यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्य़ात आल्याची घोषणा सपा अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केलीय. तर त्यांची ही कृती घटनाबाह्य असल्याचा दावा रामगोपाल यादवांनी केलाय. दरम्यान सपातील उभ्या फूटीवर अमर सिंह यांनी पहिल्यांदाच विधान केले. मी नेताजींबरोबर आहे. त्यांना माझे पूर्णपणे समर्थन असेल.