www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दोषी खासदार तसंच आमदारांच्या बचावासाठी मांडण्यात आलेल्या वटहुकूमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. पक्षाच्या एका नेत्याच्या माहितीनुसार, राहुल यांनी सकाळी जवळपारस ९.४५ वाजता पंतप्रधानांची भेट घेतली. दोघांची वटहुकूमावर चर्चा झाली. ही भेट जवळपास २५ मिनिटांपर्यंत चालली.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं. ‘माझा उद्देश पंतप्रधानपदाचा अपमान करायचा नव्हता. मी केवळ जनतेची भावना त्यांच्यासमोर मांडली. अंतिम निर्णय कॅबिनेटलाच करायचाय’ असं राहुल यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर म्हटलंय. सोबतच, राहुल यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही या अध्यादेशावर आक्षेप आहे.
दुसरीकडे, समाजवादी पार्टीनं केलेल्या एका वक्तव्यामध्ये, सरकारनं हा अध्यादेश परत घेऊ नये, असं म्हटलं गेलंय. सपा हा सरकारचा सहयोगी पक्ष आहे त्यामुळेच या पक्षाचं हे मत खूप महत्त्वाचं आहे.
राहुल गांधी यांनी यापूर्वी, हा वटहुकूम म्हणजे निव्वळ बकवास असल्याचं म्हणत तो फाडून फेकून द्यावा, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण ढवळून निघालंय. यानंतर मुख्य विरोधी पक्ष भाजपनं पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
तर, पंतप्रधानांनी मंगळवारी ‘आपण आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर राजीनामा देणार नसल्याचं’ ठामपणे सांगितलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.