www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इन्कम टॅक्स टीम धाड मारायला एका हिरा व्यापाऱ्याच्या घरी दाखल झाली होती... पण, इथं त्यांना असा काही प्रकार पाहायला मिळाला की काही काळ सर्वच जण स्तब्ध झाले.
मंगळवारी, वोरलीमध्ये राहणाऱ्या चेतन शाह या हिरा व्यापाऱ्याच्या घरी इन्कम टॅक्सची टीम दाखल झाली होती. अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर चेतन यानं अधिकाऱ्यांकडे टॉयलेटला जाण्याची परवानगी मागितली. यावेळी, अधिकाऱ्यांनी अगोदर टॉयलेटची तपासणी करावी लागेल, असं सांगितलं. याचं कारण म्हणजे, लोक आपल्या संपत्तीचे कागदपत्रं लपवून ठेवण्यासाठी टॉयलेटचाही आसरा घेतात, असं अनेकदा समोर आलंय.
यानंतर वैतागलेल्या चेतननं अचानक आपले कपडे उतरवले... ‘पाहा, पाहा माझ्याकडे काहीही नाहीए’ असं ओरडून ओरडून तो सांगू लागला. इन्कम टॅक्सच्या या टीममध्ये दोन पोलीस अधिकारी महिलाही होत्या. त्यामुळे, महिला पोलीस आणि इतर सर्वच जण या प्रकारानं हबकून गेले.
चेतन शाह डिसेंट डायमंड कंपनीचा मालक आहे. या कंपनीचा टर्नओव्हर 800 करोडोंच्या आसपास आहे. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत 100 ते 200 करोडोंचे बनावट बिल आणि व्हाऊचर्स ताब्यात घेण्यात आलेत.
या घटनेनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. मंगळवारी सकाळी हिरा व्यापारी वोरली पोलिसांनी अटक केलीय. कोर्टानं त्याला दोन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत धाडलंय. चेतनवर आयपीसी कलम 509 आणि 354 लावण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.