मुंबई : गेल्या दहा बारा दिवसांपासून देशात फक्त एकच चर्चा आहे... ती म्हणजे नोटबंदीची... सामान्य माणसासाठी ही नोटबंदी कठीण होतीच... पण त्याहीपेक्षा नोटबंदीनंतर मोठं आव्हान होतं बँकांसमोर..... पण बँकांनी या परिस्थितीचा योग्य सामना केला आणि आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय... या सगळ्या काळात भारतामधल्या तीन मोठ्या बँकांची धुरा समर्थपणे हाताळली तीन महिलांनी..... भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधारस्तंभ असणाऱ्या या महिलांवरचा हा स्पेशल रिपोर्ट...
8 नोव्हेंबरच्या रात्री मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली... आणि एकच हलकल्लोळ झाला... माझ्या पैशाचं काय? हा प्रश्न सामान्य माणसाला पडला. तर एवढ्या सगळ्या जनतेला पैसा पुरवायचा कसा, हा सगळ्या बँकर्सना पडलेला प्रश्न.... ज्या क्षणी मोदींनी जाहीर केलं, त्याच क्षणी सगळ्यांना हा निर्णय समजला... त्यामुळे कुठल्याच बँकांची पूर्वतयारी नव्हती.
निर्णयक्षमता, कामाची गती, ग्राहकांचं समाधान, पैसे उपलब्ध करण्यासाठीची जमवाजमव, कर्मचा-यांना जास्त वेळ काम करण्यासाठीची विनंती किंवा आदेश या सगळ्यात पातळ्यांवर बँकर्सना कसरत करावी लागणार होती... पण हा सगळा भार समर्थपणे पेलला देशातल्या महत्त्वाच्या तीन महिला बँकर्सनी.... एसबीआयच्या अरुंधती भट्टाचार्य, आयसीआयसीआयच्या चंदा कोचर आणि ऍक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांनी....
मोदींच्या भाषणानंतर लगेचच या तिघींनीही आपापल्या बँकांमधली चक्रं हलवायला सुरूवात केली... रात्र थोडी आणि सोंग फार ही म्हणं अगदी फिट्ट बसावी अशीच परिस्थिती होती... 9 तारखेचा एक दिवस ग्राहकांसाठी बंद होता. देशातल्या सर्वाधिक ग्राहकांना सेवा देणा-या एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक या दोन बँकामध्ये कामचा पसारा अवाढव्य होता... बँकिंग यंत्रणा एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी असते.
- बँकेत असलेल्या कॅशचा आढावा घेणं
- पुढच्या उपाययोजनांसाठी आरबीआयशी समन्वय साधणं,
- बँकेच्या कर्मचा-यांकडून जास्त तास काम करुन घेणं,
- एटीएम सेंटर्समध्ये असलेल्या कॅशचा आढावा घेणं
- 9 आणि 10 डिसेंबरला एटीएम सेंटर्स बंद ठेवण्यात होती.
- दोन दिवसांनी एटीएममध्ये कॅश तयार ठेवणं
- त्यासाठी लॉजिस्टिक आणि कॅश मॅनेज करणं,
- दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांनुसार एटीएम मशीन्सचं रिकॅलिबरेशन करणं,
- चलनातून बाद झालेल्या नोटांचा पूर सांभाळणं
- ग्राहकांशी प्रत्यक्ष डील करणं....
- त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची हमी देणं
एक चूक आणि सारा खेळ खल्लास... अरुंधती भट्टाचार्य, चंदा कोचर आणि शिखा शर्मा या तिघींनी काळ्या पैशाविरोधातल्या युद्धाचं पुढे येऊन नेतृत्व केलंय.
अरुंधती भट्टाचार्य मूळच्या कोलकात्याच्या... खरं तर इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांना करिअर करायचं होतं पण नोकरीच्या शोधात त्यांनी एसबीआयच्या प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा दिली. तेव्हापासून त्या एसबीआय अक्षरशः जगल्यायत... भारतभरातल्या एसबीआयच्या बहुतांश शाखा, तसंच न्यूयॉर्कमधली बँकेची शखा त्यांनी समर्थपणे सांभाळलीय. एसबीआय कॅपिटलच्या एमडी आणि सीईओ म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उत्तम राहिली... आणि त्याच जोरावर त्या एसबीआयच्या अध्यक्ष झाल्या.
मूळच्या जयपूरच्या असलेल्या चंदा कोचर मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून यांनी आयसीआयसीआय बँकेत रुजू झाल्या.... मॅनेजमेंट ट्रेनी ते बँकेच्या अध्य़क्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालीच आयसीआयसीआय जगी क्षेत्रातली पहिल्या क्रमांकाची बँक झाली. चंदा कोचर यांचा बँकेच्या प्रगतीतला वाटा ओळखून त्यांना महिन्याला चक्क 45 लाख इतकं मानधन दिलं जातं.
बँकिंग क्षेत्रातलं आणखी एक अग्रगण्य नाव म्हणजे शिखा शर्मा... त्या अॅक्सिस बँकेच्या अध्यक्ष आहेत... त्यांनी आयसीआयसीआय बँकेपासून करिअरची सुरुवात केली. आयसीआयसीआयमधल्या 29 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता त्या अॅक्सिस बँकेच्या अध्यक्षा आहेत.
अरुंधती भट्टाचार्य, चंदा कोचर आणि शिखा शर्मा या तिघींचा समावेश फोर्ब्सनं जगातल्या शक्तिशाली महिलांच्या यादीत केला आहे. या तिघींबरोबरच बँकिंग क्षेत्रातलं आणखी एक उल्लेखनीय नाव म्हणजे उषा अनंथ सुब्रमण्यम... त्या सध्या पंजाब अँड नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. स्टॅटिस्टिक्स आणि भारतीय संस्कृतीमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवलीय. भारतीय महिला बँकेच्या त्या अध्यक्ष होत्या.
जिच्या हाती पाळण्याची दोरी...ती जगाते उद्धारी ही आपल्याकडची म्हण...पण भारतीय समाजानं कूस बदललीय. बँकिंग क्षेत्रात आपापली चोख भूमिका बजावणा-या या तिघी अर्थव्यवस्थेच्याही आधारस्तंभ आहेत... यांच्या हाती बँकिंगची दोरी आहे..म्हणून सव्वाशे कोटी जनतेला अजूनही रस्त्यावर उरतण्याची वेळ आलेली नाही...आणि यापुढेही येणार नाही याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही...