www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना २६ जुलैला हजर राहण्याचे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहे. बिहारी नागरिकांविरुद्ध तथाकथित द्वेषाचे भाषण करण्याचा आरोप असल्यामुळे दिल्ली कोर्टाने हे आदेश दिले आहे.
राज ठाकरे यांनी वैयक्तिक विनंती करून सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्याची मागणी केली होती, परंतु ही मागणी फेटाळण्यात आली आहे. राज यांना वाय श्रेणीची सुरक्षा मिळाली असल्याने ते कोर्टात हजर राहू शकत नाही. मुख्य न्यायदंडाधिकारी देवेंद्र कुमार शर्मा यांनी अशा प्रकारचे कारण देऊन सूट मिळू शकत नसल्याचे सांगितले. त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला कोर्टात हजर राहण्यास कोणतीही समस्या उद्भवू शकत नाही.
या संदर्भात ३ जानेवारी २००९ रोजी राज ठाकरे याच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट जारी केला होता. या वेळी मनसे प्रवक्ता शिरीष पारकर यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. पारकर या प्रकरणात सहआरोपी आहे.
बिहार स्टेट बार कौउंसिलचे सदस्य आणि वकिल प्रेमचंद जयस्वाल यांच्या तक्रारीनंतर हा आदेश देण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी बिहारी नागरिकांविरोधात द्वेषाचे भाषण केले होते. तसेच राज ठाकरे यांनी धार्मिक छठ पूजेलाही अपमानित केल होते. तसेच राज ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बिहारी लोकांना धमकावले होते. हे प्रकरण २००८मध्ये पाटणा येथील न्यायालयात दाखल करण्यात आले, पण २०१० रोजी दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.