`आप`ला आश्वासनाचा विसर, केजरीवाल यांचे घर १० खोल्यांचे

स्वतःची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्याचं सांगत वारंवार कौतुक करवून घेणा-या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीचे खरेखुरे दर्शन आता होऊ लागलं आहे. आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री झालो तरी सरकारी गाडी, बंगला घेणार नाही असं सांगणा-या आम आदमी पार्टीला या आश्वासनाचा लगेचच विसर पडल्याचं दिसतंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 4, 2014, 09:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्वतःची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्याचं सांगत वारंवार कौतुक करवून घेणा-या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीचे खरेखुरे दर्शन आता होऊ लागलं आहे. आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री झालो तरी सरकारी गाडी, बंगला घेणार नाही असं सांगणा-या आम आदमी पार्टीला या आश्वासनाचा लगेचच विसर पडल्याचं दिसतंय.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लवकरच भगवानदास मार्गावरच्या आलिशान बंगल्यामध्ये शिफ्ट होतायत... तिथं त्यांनी २ ड्युप्लेक्स सरकारी बंगले घेतलेत. या दोन्ही बंगल्यांचा बिल्टअप एरिया साधारण ६ हजार चौरस फुटांच्या घरात आहे... यातल्या एकात केजरीवाल राहणार आहेत, तर दुस-यात त्यांचं कार्यालय असणार आहे.
दुसरीकडे दिल्लीच्या मंत्री राखी बिर्ला यांनीही सरकारी गाडी घेतलीये. त्यामुळे बहुमत सिद्ध होताच आम आदमी पार्टीनं दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासल्याचं दिसतंय. ही संधी साधत भाजपनं `आप`वर टीका केलीये. याची उत्तरं देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री मनिष सिसोदिया यांच्या नाकी नऊ आले, तर सरकारी कामासाठी सरकारी गाडी वापरणारच, असं उत्तर देऊन वेळ मारून नेली आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं सरकार आल्यापासून त्यांचा अक्षरशः उदो उदो सुरू आहे... लाल दिव्याची गाडी वापरत नसल्याबद्दल त्यांचं कोडकौतुक होतंय... परंतु गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या दीड वर्षांपासून असाच राज्यकारभार चालवतायत. तो देखील कसलाही गाजावाजा न करता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.