'आप'च्या 'मृत' कार्यकर्त्याला 'जिवंत' अटक

चार महिन्यांपूर्वी मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या 'आम आदमी पार्टी'च्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी बंगळुरूहून जिवंत अटक केलीय.

Updated: Aug 27, 2014, 01:14 PM IST
'आप'च्या 'मृत' कार्यकर्त्याला 'जिवंत' अटक  title=

नवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या 'आम आदमी पार्टी'च्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी बंगळुरूहून जिवंत अटक केलीय.

ग्रेटर नोएडाचा रहिवासी असलेल्या चंद्रमोहन शर्मा (आरटीआय अॅक्टिव्हिस्ट) याला मंगळवारी पोलिसांनी अटक केलीय. यानंतर, चार महिन्यांपूर्वी चंद्रमोहनच्या गाडीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह कुणाचा होता? असा प्रश्न आप कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय. 

38 वर्षांचा चंद्रमोहन आपली पत्नी आणि आपच्या कार्यकर्त्या सविता शर्मा यांच्यासोबत राहत होते. 2 मे 2014 रोजी रात्री उशीरा चंद्रमोहनच्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत एक शव सापडलेलं होतं. कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी या मृतदेहाची ओळख चंद्रमोहन म्हणून केली होती. गाडीनं अचानक पेट घेतल्यानं हा अपघात घडला असावा, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

पण, कुटुंबीयांनी मात्र चंद्रमोहन याची हत्या करण्यात आली असावी, अशी शंका उपस्थित केली होती. त्यांनी अनेकांवर आपला संशय असल्याचंही सांगितलं होतं. 

मोबाईल लोकेशन आणि काही मोबाईल नंबरवर लक्ष ठेवल्यानंतर पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले होते. त्यानंतर, काही मोबाईल नंबर पडताळल्यानंतर  चंद्रमोहन जिवंत असून तो नेपाळमध्ये लपला असल्याचं पोलिसांच्या ध्यानात आलं.  चंद्रमोहन आणि त्याच्यासोबत असलेली मुलगी आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते. 

जवळपास एका आठवड्यापूर्वी संशयास्पद फोनचं लोकेशन बंगळुरू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यावर, पोलिसांनी पडताळणी केली असता चंद्रमोहन आपल्या प्रेयसीसोबत लपलेला आढळला. 

आपल्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी चंद्रमोहननंच आपल्या अपघाताचा सोंग रचलं होत का? यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.