नवी दिल्ली : मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच लपून बसल्याच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झालंय, आणि हे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द संयुक्त राष्ट्रानंच याला दुजोरा दिलाय.
दाऊदच्या पाकिस्तानातल्या वास्तव्याबाबत भारतानं संयुक्त राष्ट्राला ९ ठिकाणचे पत्ते दिले होते. यातले तब्बल सहा पत्ते खरे असल्याचं संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय. त्यामुळं दाऊदच्या नावानं नेहमी कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाऊदनं २ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांचा मुलगा बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या घराजवळच नवीन घर घेतल्याची माहिती उघड झाली आहे.
यासंदर्भात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांनी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजिज यांना माहिती दिली होती. यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत दोघांमध्ये बैठकही होणार होती. मात्र ती नंतर रद्द करण्यात आली.