विशाखापट्टणम: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुडहुड चक्रीवादळानं झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विशाखापट्टणमला जातायेत. आंध्र प्रदेश आणि ओडिशा मधील समुद्र किनाऱ्यांवर वादळामुळं खूप नुकसान झालंय.
आतापर्यंत वादळामुळं 24 जणांचा मृत्यू झालाय. यापैकी १५ जण हे विशाखापट्टणम जिल्ह्यातील असून, पाच जण विजयनगरम आणि एक श्रीकाकुलम जिल्ह्यातील आहे, अशी माहिती राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या विशेष आयुक्तांनी दिलीय. ओडिशात तिघांचा मृत्यू झालाय.
Have been constantly taking updates on Cyclone Hudhud. Spoke to AP CM. Will visit Visakhapatnam tomorrow & take stock of the situation.
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2014
वाऱ्याचा वेग आता कमी झाला असला, तरी किनारपट्टीसह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. सुमारे २०० किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणाऱ्या 'हुडहुड' चक्रीवादळानं आंध्र प्रदेशाची उत्तर आणि ओडिशातील दक्षिण किनारपट्टीला तडाखा दिलाय. वादळाचा जोर ओसरला असला तरी विशाखापट्टणम, श्रीकाकूलम आणि विजयनगरम या जिल्ह्यांमध्ये, तसंच ओडिशामधील काही भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळामुळं आंध्र प्रदेशच्या ३२० गावांमधील दोन कोटी ४८ लाख बाधित झाले आहेत, तर एक लाख ३५ हजार २६२ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. या वादळामुळं किमान १० हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसंच छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगण, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.