‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?

दहशतवादाचा सर्वात मोठा म्होरक्या बगदादीची नजर आता भारताकडे वळलीय. त्याची एक झलक श्रीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसून आली. 

Updated: Oct 14, 2014, 12:11 PM IST
‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर? title=

नवी दिल्ली : दहशतवादाचा सर्वात मोठा म्होरक्या बगदादीची नजर आता भारताकडे वळलीय. त्याची एक झलक श्रीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसून आली. 

भारताच्या भूमीवर पहिल्यांदाच दहशतवादी संघटना इसिसचा काळा झेंडा नजरेस पडलाय. यावरून इसिस काश्मीरमध्ये आपला अड्डा तयार करत असल्याची शक्यता व्यक्त होतेय. नुकत्याच झालेल्या ईदच्या दिवशीच हे काळे झेंडे समोर आलेत. गाझा पट्टीमध्ये इजरायली हल्ल्यांविरोधात श्रीनगरमध्ये ६ ऑक्टोबरला प्रदर्शन करण्यात आलं. त्यावेळी जमाव हाताबाहेर जात होता. प्रदर्शन करणाऱ्या जमावाला सैन्यानं रोखण्याचा प्रयत्न केला तर जमावानं उलट दगडफेक सुरू केली.

प्रदर्शनादरम्यानच जमावामध्ये सामील असलेले दोघे जण स्कार्फ बांधलेले दहशतवादी संघटना इसिसचा काळा झेंडा फडकवताना दिसून आले. त्यामुळे जगासाठी सर्वात मोठा धोका असलेल्या इसिसचा भारतात प्रवेश झालाय की काय? असा प्रश्न निर्माण होतोय. असं असेल तर हा भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो, असं सिक्युरिटी एक्सपर्ट आलोक बन्सल यांचं म्हणणं आहे.  

दहशतवादाचा सर्वात मोठा काळा चेहरा समोर आल्यानंतर ‘इंटेलिजन्स ब्युरो’ सतर्क झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये एक वरिष्ठ पातळीवर बैठक झाली ज्यामध्ये या घटनांवर एक अहवाल मागवण्यात आलाय.

इसिसचा झेंडा ज्यावेळी काश्मीरमध्ये फडकवण्यात आला, त्याच्याआधी काही वेळ श्रीनगरमध्ये जामा मस्जिदमध्ये अलगाववादी नेते मीरवाईज उमर फारुकनं लोकांमध्ये भाषण केल्याचं सांगण्यात येतंय. त्यावरून इसिस भारतामध्ये स्वत: आपली जागा तयार करतोय किंवा कुणीतरी आहे जो त्यांच्यामागे उभा असल्याचं दिसतंय...   

प्रश्न असाही आहे की, भारतात बगदादीचा घुसखोरीचा प्रयत्न हा काश्मीरमधूनच का झाला? तसंच काश्मीरचे अलगाववादी नेते पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसह आता इसिसलाही मदत करतायत का? असा प्रश्न निर्माण होतो. 

भारतात घुसखोरी करण्याची इसिसची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही इसिसनं इंडियन मुजाहिद्दीनच्या साथीनं भारतात प्रवेशाचा प्रयत्न केला होता. घाटीमध्येच २७ जून २०१४ ला श्रीनगरमध्ये एका रॅली दरम्यान इसिसचा झेंडा फडकवण्यात आला होता. सोबतच बाटला हाऊस एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिदची छायाचित्रं दहशतवादी संघटना अंसार-उल-तवाहिदनं ट्विटरवर टाकून त्याचा बदला घेण्याची धमकी दिली होती. 

हे वृत्त दहशत पसरवण्यासारखं आहे. कारण, आत्तापर्यंत काश्मीर फक्त पाकिस्तानातून पाठवलेले दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं. मात्र, आता भारत जागतिक दहशतवादाच्या निशाण्यावर आलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.