काँग्रेसकडून प्रियंका गांधी उत्तर प्रदेश निवडणूक रिंगणात

नरेंद्र मोदी सरकारने उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले दिवस येण्यासाठी दलित नेत्यांना मंत्रीपद देऊन निवडणुकीची बिगुल वाजवलेय. आता काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून प्रियंका गांधी-वढेरा यांनाच उतविण्याचा चंग बांधला आहे.

Updated: Jul 5, 2016, 04:45 PM IST
काँग्रेसकडून प्रियंका गांधी उत्तर प्रदेश निवडणूक रिंगणात title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले दिवस येण्यासाठी दलित नेत्यांना मंत्रीपद देऊन निवडणुकीची बिगुल वाजवलेय. आता काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून प्रियंका गांधी-वढेरा यांनाच उतविण्याचा चंग बांधला आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेसला उभारी देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी मैदानात उतरण्याची हालचाली सुरु आहेत. प्रियंका गांधींसमोर ठेवण्यात आलेला प्रस्ताव मान्य करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रियंका यांनी जर कबुल केले तर  उत्तर प्रदेशात पक्षाची असलेली बिकट परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असा व्होरा आहे.
 
रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात प्रचार करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आपली भूमिका वाढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. प्रियंका गांधींनी याअगोदर फक्त आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्यासाठीच प्रचार केलाय.

काँग्रेसने उत्तर प्रदेशची जबाबदारी गुलाम नबी आझाद यांच्यावर सोपली आहे. प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यामुळे त्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजक्ट करावे, असे मत स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले होते.

त्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये दोन वेळा चर्चा झाली आहे. या चर्चेत गुलाम नबी आझाद आणि प्रशांत किशोरदेखील सहभागी झाले होते. राहुल गांधी २० जूनला सुट्टीवर गेल्यानंतर सोनिया आणि प्रियांका गांधींनी पुन्हा एकदा गुलाम नबी आझाद आणि प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली होती, त्यामुळे तसे संकेत मिळाले आहेत.