www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी घेतलेल्या ७०० नव्या प्रशासकीय आस्थापनांच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये बेबनाव झालाय. काँग्रेसच्या नेत्यांनी या धोरणावर जाहीर टीका केल्यानंतर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
दोन्ही पक्षांमध्ये समझोता करण्यासाठी काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर प्रभारी अंबिका सोनी, प्रदेशाध्यक्ष सैफुद्दीन सोझ आणि केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी अब्दुल्लांची भेट घेतली.
मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे यूपीए फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचलीय. या बेबनावाचा फटका केंद्र सरकारलाही बसण्याची शक्यता आहे.
ओमर यांनी त्यागपत्र सोपवलं तर नॅशनल कॉन्फरन्स विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यावर जोर टाकू शकतं तसंच या निवडणुका लोकसभा निवडणुकादरम्यानही होऊ शकतात. ओमर यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात राज्यपाल राजवट लागू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.