www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जातीय दंगलीचा फटका बसलेल्या मुझफ्फरनगरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात समाजवादी पक्षाच्या सरकारला अपयश आल्याची टीका देशभरातून होत असतानाच, काँग्रेसनं मात्र या घटनेचा संबंध गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून भाजपतर्फे नरेंद्र मोदींचं नाव जाहीर होण्यासंदर्भातील चर्चांचा संबंध काँग्रेसनं मुझफ्फरनगरमधील दंगलीशी जोडला आहे. "मोदी यांना अजून पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून भाजपनं जाहीर केलं नाही, तरीही अशा घटना घडत आहेत. उत्तरप्रदेशचाही ‘गुजरात` करण्याचा भाजपच्या प्रयत्नांविषयी जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे,`` असं वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते रशीद अल्वी यांनी केलंय.
उत्तरप्रदेशमध्ये शांततेचं वातावरण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात समाजवादी पक्षाला अपयश आल्याची टीकाही अल्वी यांनी केलीय. या दंगलप्रकरणी भाजपचे चार आमदार आणि काँग्रेसच्या एका माजी आमदारासह ४० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रतिबंधात्मक आदेश धुडकावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवाय, जवळपास १००० जणांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.