www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांनी अखेर रोहित शेखर आपला मुलगा असल्याचं मान्य केलंय. वयाच्या तब्बल ८८ व्या वर्षी तिवारींनी ३३ वर्षीय रोहित शेखर आपलाच मुलगा असल्याचं कबूल केलंय.
तिवारी आपले वडील असल्याचं सिद्ध करण्यासाठी रोहित शेखर याला अनेक वर्ष न्यायालयीन झुंज द्यावी लागली होती. या प्रकरणी एन. डी. तिवारी यांची डीएनए चाचणीही घेण्यात आली होती. यात ते रोहितचे वडील असल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र, तरीही तिवारी हे मान्य करायला तयार नव्हते. २००८ मध्ये रोहित शेखरनं एक याचिका दाखल केली होती ज्यात एनडी. तिवारी हे आपले पिता असल्याचं नमूद करण्यात आल होतं.
रोहितच्या सहा वर्षांच्या कडव्या संघर्षानंतर तिवारींना अखेर जाग आली असून त्यांनी रोहितला आपल्या घरी बोलावून त्याचा स्वीकार केला. मीडियाशी बोलताना रोहितनं, ‘नारायण दत्त तिवारी यांनी मला मुलगा म्हणून स्वीकार केलंय आणि पुढची कारवाई कोर्टात पूर्ण होईल’ असं रोहीतनं म्हटलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री रोहित शेखर आणि नारायण दत्त तिवारी यांची भेट झाली. त्यानंतर तिवारी यांनी रोहीत आपलाच मुलगा असल्याचं म्हटलंय.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आंध्रप्रदेशचे राज्यपाल पदावर आरुढ होणाऱ्या एनडी तिवारी यांनी पहिल्यांदाच शेखर आपलाच मुलगा असल्याचं सार्वजनिकरित्या मान्य केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.