हॉरर किलिंग... प्रेमी युगुलाची कुटुंबीयांकडूनच क्रूर हत्या!

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पुन्हा एकदा हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय... पुन्हा एकदा एका तरुणीला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 19, 2013, 10:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रोहतक/चंदीगड
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पुन्हा एकदा हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय... पुन्हा एकदा एका तरुणीला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. मिळालेल्या माहितीनुसार, रोहतकमध्ये एका प्रेमी युगुलाची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आलीय. दोघांचेही कुटुंबीय फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय धर्मेन्द्र आणि २० वर्षीय निधी या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ही गोष्टी त्यांच्या घरी समजल्यानंतर त्यांनी जोरदार विरोध दर्शवला. खाप पंचायतीच्या नियमांनुसार एकाच गावातील किंवा एकाच समुदायामध्ये लग्नं होत नाहीत.
धर्मेन्द्र आणि निधी दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. गेल्या मंगळवारपासून दोघंही अचानक गायब झाले होते. पहिल्यांदा या दोघांनीही गुपचूप लग्न केल्याच्या अफवा गावभर पसरल्या होत्या. पण, नंतर मात्र या दोघांचीही हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहतक जिल्ह्यातील कलानौर गावात घराजवळच धर्मेंद्रचं मृत शरीर डोकं ठेचलेल्या अवस्थेत सापडलं. तर, निधीचा गळा कापून हत्या करण्यात आली होती. तिचं मृत शरीर एका शेतात मिळालं. तिच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अर्धवट जळालेल्या अवस्थेतलं शरीर ताब्यात घेतलं.

पोलिसांनी या प्रकरणात दोघांच्याही कुटुंबीयांविरुद्ध खटला दाखल केलाय. दोघांचेही कुटुंबीय आपलं घर सोडून बेपत्ता झालेत. त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आलंय. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.