www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडात झालेल्या महाप्रलयाने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. प्रचंड जिवितहानी या महाप्रलयात झालीय. निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे कुणाचच काही चालू शकलं नाही... अनेकांनी स्वत:च्या डोळ्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना दूर जाताना पाहिलंय पण ते काहीही करू शकले नाहीत.
मूळचा लखनऊचा असणाऱ्या एक चिमुकला तब्बल सहा दिवस आपल्या वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून आक्रांत करत होता. पण, त्याचा आवाज ऐकणारं इथं कुणीही नव्हतं. रामबाडाजवळील एका जंगलात हे बाप-लेक अडकले होते. तिथंच थंडीत कुडकुडत त्याच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला आणि पुढचे सहा दिवस त्यानं त्याच्या वडिलांच्या मृतदेहाकडे पाहातच घालवले.
हेलिकॉप्टरच्या मदतीनं या चिमुकल्याला जॉलीग्रान्ट विमानतळावर आणण्यात आलं. महाप्रलयाचे भयानक रुप पाहिल्यानंतर त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता. एव्हाना मुलाची आई आणि बहिण या बापलेकांना शोधण्यासाठी गुप्तकाशीपर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. नंतर या कुटुंबाला जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने डेहराडून विमानतळावर आणलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.