www.24taas.com, नवी दिल्ली
हैदराबाद न्यायालयानं शुक्रवारी किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. विजय माल्या यांच्यासहित किंगफिशरच्या अन्य पाच अधिकाऱ्यांवर अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलंय.
इन्फ्रास्ट्रक्टर कंपनी ‘जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’च्या (जीएचआईएएल) तक्रारीनंतर हैदराबाद न्यायालयानं हे अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय कंपनीच्या देखरेखीची जबाबदारी ‘जीएचआईएएल’ कंपनीकडे आहे.
‘जीएचआईएएल’ कंपनीचं १०.३ करोड रुपये देणं किंगफिशरकडे बाकी होतं. ज्यामध्ये पार्किंग, लँन्डींग आणि नेव्हिगेशन शुल्काचा समावेश होता. किंगफिशर एअरलाईन्सकडून जीएमआर कंपनीला मिळालेला चेक बाऊन्स झाला होता. याविरोधात जीएमआर कंपनीनं न्यायालायात दाद मागितली होती. यावर न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी किंगफिशरचे मालक विजय मल्ल्यांना समन्स बजावण्यात आले होते पण मल्ल्यांनी मात्र त्याला दाद दिली नाही. त्यानंतर न्यायालयानं मल्ल्या यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलंय.
मे २००५ नंतर किंगफिशर नफा मिळवण्यात अपयशी ठरत गेली. मागच्या वर्षी किंगफिशर एअरलाईन्स देशातील शेवटच्या दोन एअरलाईन्सपैकी एक होती. या वर्षी तर या एअरलाईन्सची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याचंच दिसून येतंय.