www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार आज सकाळी साडेआकरा वाजता झाला. यावेळी 7 कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि 13 राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये के. रहेमान खान, दिनशा पटेल, अजय माकन, पल्लम राजू, अश्विनी कुमार, हरिश रावत आणि चंद्रेश कुमारी कटोच यांचा समावेश आहे.
काँग्रेसमध्ये कायम चर्चेत असलेल्या राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडकडे या मंत्रिमंडळ विस्तारात दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय. मिलिंद देवरा यांना अपेक्षेप्रमाणे स्वतंत्र कार्यभार मिळालेला नाही. तर ज्योतिरादित्य शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळेल, असं मानलं जात असताना त्यांनाही डावलण्यात आलंय. सरकारवर असलेला राहुल गांधींचा प्रभाव कमी झालाय की आपलं मंत्रिमंडळ अधिक प्रगल्भ दिसावं, या भूमिकेतून मनमोहन सिंग यांनी ही नावं वगळलीत, याची चर्चा आता सुरू झालीये.
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राची घोर निराशा झालीये. अगदी कालपर्यंत राज्यातून अनेक नावं घेतली जात होती. मात्र प्रत्यक्षात तारिक अन्वर यांचा अपवाद वगळला, तर राज्याच्या वाटेला एकही मंत्रिपद आलेलं नाही. गुरूदास कामत, विलास मुत्तेमवार, शिवराज पाटील-चाकुरकर आणि भास्करराव खतगावकर हे चर्चेत असलेले नेते नव्या मंत्रिमंडळात नाहीत. याखेरीज मिलिंद देवरा यांना स्वतंत्र कार्यभार दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसंही झालेलं नाही. एकूणच आता केंद्रीय मंत्रिमंडळातलं महाराष्ट्राचं वजन कमी झालंय. सुशिलकुमार शिंदे आणि शरद पवार वगळता राज्यातून एकही मोठा मंत्री केंद्रात नाही...