भाजपच्या तोफा थंडावल्या!

भारताच्या सीमेचे रक्षण करताना पाच-पाच जवान शहीद होतात, पण संसदेत मात्र त्यावरून रंगतो तो राजकारणाचा खेळ... हा हल्ला पाकिस्तानी सैन्यानंच केला होता, असं केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी आज अखेर मान्य केलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 8, 2013, 08:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताच्या सीमेचे रक्षण करताना पाच-पाच जवान शहीद होतात, पण संसदेत मात्र त्यावरून रंगतो तो राजकारणाचा खेळ... हा हल्ला पाकिस्तानी सैन्यानंच केला होता, असं केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी आज अखेर मान्य केलं. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर फायरिंग करणा-या भाजप नेत्यांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.
हे आपले संरक्षणमंत्री ए. के. अँटनी... भारतीय सैनिकांवर अमानुष गोळीबार करून त्यांना ठार करणारे पाकिस्तानी सैनिकच होते, हे सत्य समजायला त्यांना तीन दिवस लागले... संपूर्ण देशामध्ये पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली असताना, संरक्षणमंत्र्यांना काळजी वाटत होती ती भारत-पाक मैत्रीपूर्ण संबंध बिघडणार तर नाहीत ना... याची. न्यूयॉर्कमध्ये पुढील महिन्यात होणा-या पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील वाटाघाटींना खिळ बसणार नाही ना.. याची चिंता त्यांना असावी.
अँटोनी यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याने अशी घोडचूक केल्यानं, भाजपच्या हाती आयतंच कोलीत मिळालं. अँटोनींनी देशाची माफी मागावी, यासाठी भाजप आणि अन्य विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घालत तीन दिवसांपासून संसद डोक्यावर घेतली.
अँटोनींनी लष्करप्रमुख बिक्रम सिंह यांची भेट घेतली. लष्करप्रमुखांनी दिलेल्या ताज्या माहितीनंतर अँटोनींनी अखेर निवेदनात दुरूस्ती केली. त्यांच्या बदलेल्या भूमिकेचं विरोधकांनी स्वागत केलं असलं तरी सुषमा स्वराज यांनी एन्टोनींना सुनावण्याची संधी सोडली नाही.
पण अँटोनींनी आपली चूक मान्य केली, यावरच समाधान मानण्यात अर्थ नाही. या नापाक हल्ल्याला भारत सडेतोड उत्तर देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार का याकडे सा-या देशवासियांचे लक्ष लागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.