www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत सत्तास्थापनेचा घोळ सुरूच आहे. अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी नायब राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राजनाथ सिंह यांना पत्र पाठवलंय. या पत्रात त्यांनी काँग्रेस आणि भाजपपुढे १८ अटी ठेवल्यात. देशात प्रथमच या मुद्द्यांच्या आधारावर सरकार बनेल असं सांगताना केजरीवाल यांनी काँग्रेससह भाजपवर टीकास्त्र सोडलंय.
केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रावर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आलीय. केजरीवाल ढोंगी आहेत. त्यांची भाषा अहंकाराची आहे अशी टीका भाजप नेते बलबीर पुंज यांनी केलीय. तर दिल्ली काँग्रेस अध्यक्ष जे. पी. अग्रवाल यांनी केजरीवाल यांची बूड स्थिर नसलेला लोटा अशा भाषेत संभावना केलीय.
आम आदमी पार्टी संभ्रमावस्थेत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला विरोध करत फक्त काँग्रेसला मदत करण्याची पक्षाची भूमिका असल्याचा आरोप भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलाय. दिल्लीमध्ये मत मोजणी झाल्यानंतर नागपूरला पहिल्यांदाच आले होते.
आम आदमी पार्टीच्या एकूणच भूमिकेवर आता काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आम आदमी पार्टीवर दोन्ही बाजूंनी टीका सुरू झालीय. आम आदमी पार्टीचे नेते आठवी पास तरी आहेत का असा सवाल किर्ती आझाद यांनी केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.