तिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. 

Updated: Jun 8, 2015, 03:39 PM IST
तिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार title=

पाटणा: अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. 

मुलायमसिंग यादव आणि लालूप्रसाद यादव या दोघांनी तसं पत्रकारांना सांगून परिवारामध्ये मुख्यमंत्रीपदावरून खेचाखेची नसल्याचं सांगितलं. तसंच जागावाटपही आपसात समजूतदारपणे करण्यात येईल असंही ते म्हणाले.

भाजपाला बिहारच्या निवडणुकांमध्ये धूळ चारायचीच असा विश्वास मुलायम, लालू आणि नितीशकुमार यांनी व्यक्त केला आणि त्यासाठी सगळे मतभेद विसरून जनता परीवार एकत्र आल्याचं सांगितलं. भाजपाच्या जातीयवादाला संपवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं या तिनही नेत्यांनी सांगितलं. जनता परीवाराचे लोकसभेमध्ये १५ खासदार आहेत तर सध्या बिहारमध्ये जनता दल युनायटेडची सत्ता असून नितीशकुमार मुख्यमंत्री आहेत.

जनता परीवार एकत्र आल्यामुळं तसंच त्यांच्यासोबत काँग्रेसही राहणार असल्याचं नितीशकुमारांनी स्पष्ट केलं असल्यामुळं या सगळ्यांचा मुकाबला भाजपा कसा करतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.