www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतरत्न सी.एन. आर. राव यांनी विज्ञान क्षेत्रासाठी कमी निधी दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी ‘मूर्ख’ म्हणून संबोधलंय.
सरकारकडून मिळणाऱ्या पैशांत फार काही करू शकत नाही, अशी खंत नुकतंच भारतरत्न घोषित झालेल्या सी. एन. आर. राव यांनी व्यक्त केलीय. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘माहिती तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे… भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे’ असेही त्यांनी नमूद केले. ‘सरकारकडून विज्ञान क्षेत्राला पैसे मिळावेत यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण, अशा मूर्ख राजकारण्यांकडून मिळणारा पैसा खूपच कमी आहे, तरीही आपल्या शास्त्रज्ञांनी खूप काम करून दाखवलंय... विज्ञान क्षेत्रातील आपली गुंतवणूक कमी आहे, तीही उशिरा मिळते. मिळाल्यानंतर त्याचे आपण सोनं करतो’ असं त्यांनी यावेळी म्हटलंय.
‘पंतप्रधानांनी या क्षेत्रात जास्त गुंतवणुकीचं आश्वासन दिलंय... पण अजूनपर्यंत तरी असं झालेलं नाही’ असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. राव हे पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्राला आणखी निधी मिळण्याची गरज असल्याचं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.