नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौ-याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २५ जानेवारीला ओबामा पहाटे पाऊणे पाच वाजता राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत. एअर फोर्स वन या खास जेटलाइनर विमानानं ते भारतात पोहोचतील.
एअर फोर्स वन म्हणजे अमेरिकेचं दुसरं व्हाईट हाऊस मानलं जातं. या अत्याधुनिक विमानात प्रेसिडेन्शियल सूट, कॉन्फरन्स रूम, मेडिकल सूट, राष्ट्राध्यक्षांच्या खास माणसांसाठी प्रायव्हेट केबिन्स, तब्बल १०० माणसांची भूक भागवू शकेल, अशी फुड गॅलरी तसंच हायटेक संरक्षण प्रणाली आहे.
भारतात दाखल झाल्यानंतर दिल्लीतल्या हैदराबाद हाऊसमध्ये ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून दिल्लीतल्या शासकीय कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.
त्यानंतर २७ जानेवारीला आग्राच्या ताजमहलला भेट देणार आहेत. तीन दिवसांचा दौरा संपल्यानंतर ओबामा २७ जानेवारीला संध्याकाळी मायदेशी रवाना होणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.