ऑनलाईन बँकिंगला पासवर्ड नाही, 'खुलजा सिम सिम' म्हणा

आता बँकेचे ऑनलाईन व्यवहार करतांना पासवर्ड हँकिंगचा धोका कमी होणार आहे, कारण तुमचा आवाज हाच पासवर्ड असणार आहे.

Updated: May 25, 2015, 05:47 PM IST
ऑनलाईन बँकिंगला पासवर्ड नाही, 'खुलजा सिम सिम' म्हणा title=

नवी दिल्ली : आता बँकेचे ऑनलाईन व्यवहार करतांना पासवर्ड हँकिंगचा धोका कमी होणार आहे, कारण तुमचा आवाज हाच पासवर्ड असणार आहे.

आपल्या ग्राहकांसाठी  आयसीआयसीआय बँकेने 'व्हॉइस पासवर्ड' सुविधा सादर केली आहे. आवाजाचा उपयोग करून बँकेचे सर्व व्यवहार करता येणार आहेत, तसेच त्यासाठी पासवर्डची आवश्यकता नसेल.

'व्हॉइस रिकग्निशन सर्विस'मार्फत ग्राहकांच्या आवाजाची ओळख पटवून त्यांना फोनवरून बँकेचे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे बँकेने सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

आतापर्यंत व्यवहारांची गुप्तता राखण्यासाठी ग्राहकांना कार्ड नंबर सांगणे, सिक्युरिटी क्वेशन्सचे उत्तर देणे तसेच पिन नंबर सांगणे यासारख्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करावा लागत असे. आता ग्राहकांचा आवाजच त्यांचा पासवर्ड म्हणून काम करेल असे बँकेने म्हटले आहे.

एकूण ३.३ कोटी सेव्हिंग्स खातेधारक आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. "ग्राहकांच्या रोजच्या बँकिंग व्यवहारात सुलभता आणण्यासाठीच आम्ही या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे", असे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी म्हटले आहे.

आवाजातील नियमन, गती आणि उच्चारणावर प्रत्येकाचा आवाज वेगळा ठरतो. त्याची नक्कल करता येत नाही. या आधारावर प्रत्येकाच्या आवाजाची 'व्हॉइस प्रिंट' तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जेव्हा ग्राहक नोंदणीकृत मोबाईल नंबरवर फोन करून आपल्या आवाजाचा उपयोग करतील तेव्हा त्याला व्हॉइस प्रिंटशी जुळवून व्यवहार केला जाईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.