नवी दिल्ली : ए दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय. या वादात आता केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियोनीही उडी घेतलीय.
मनसे हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका सुप्रियो यांनी केलीय. ए दिल है मुश्किल चित्रपटाची निर्मिती संस्था धर्मा प्रॉडक्शनच्या वतीनं अपूर्व मेहता, फॉक्स स्टार्सचे विजय सिंग आणि प्रोड्युसर्स गिल्डचे मुकेश भट्ट यांनी, आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांची भेट घेतली. यावेळी बाबुल सुप्रियोही उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना बाबुल सुप्रियोंनी मनसे हा गुंडांचा पक्ष असल्याचं म्हटलंय. तर मनसेनं इशारा दिलेला असला तरी सरकार आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं या बैठकीनंतर मुकेश भट्ट यांनी म्हटलंय.
शिवाय गृहमंत्र्यांनी पूर्ण सुरक्षेचं आश्वासनही दिल्याचं भट्ट म्हणाले. प्रोड्युसर्स गील्डनं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश देण्याची मागणी केलीय.