नवी दिल्ली : जर तुमची बँक घरापासून दूर आहे अथवा बँकेतील मोठ्या रांगांमुळे तुमचा अधिक वेळ जात असेल तर ही समस्या लवकरच दूर होणार आहे. कारण बँकेची सर्व कामे तुम्ही एका एटीमद्वारे करु शकणार आहात. त्यामुळे बँकांची कामे करायला तुम्हाला बँकेत जावं लागणार नाही.
आरबीआयने इतर बँकांना ऑफसाईट एटीएमद्वारे बँकिग सुविधा देण्याची परवानगी दिलीय. त्यामुळे कर्जासाठी आवेदन करणे, ड्राफ्ट बनवणे, रेल्वे तिकीट, वीज अथवा पाणी बिल भरणे ही सर्व कामे तुम्ही एटीएमद्वारे करु शकणार आहात.
याआधी एटीएमद्वारे ११ प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. यात पैसे काढणे, पिन नंबर बदलणे, चेक बुकसाठी रिक्वेस्ट, अकाउंट स्टेटमेंट, बँलेस तपासणे, दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, दुसऱ्या बँकेतून ग्राहकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर, बँकांना ईमेल पाठवणे याप्रकारच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र यासोबतच अधिक सेवा देण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहकांना बँकेत येण्याची गरज पडणार नाही.