आसारामविरुद्ध बोलणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू...

अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेला प्रवचनकर्ता आसाराम याच्याविरुद्ध मुख्य साक्षीदार असलेल्या अमृत प्रजापती यांनी आज (मंगळवारी) अखेरचा श्वास घेतला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 10, 2014, 02:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेला प्रवचनकर्ता आसाराम याच्याविरुद्ध मुख्य साक्षीदार असलेल्या अमृत प्रजापती यांनी आज (मंगळवारी) अखेरचा श्वास घेतला.
गुजरातच्या राजकोटमध्ये 23 मे रोजी प्रजापती यांच्यावर अगदी जवळून बंदूकीनं गोळी झाडण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये इलाज सुरू होते. त्यांच्यावर गोळी झाडण्याच्या घटनेत आसाराम याच्याच सहा साथीदारांवर आरोप ठेवण्यात आलेत. प्रजापती हे आसारामकडे काही दिवस वैद्य म्हणून काम करत होते.
आश्रामातून हकालपट्टी होण्याआधी तब्बल बारा वर्षे अमृत तिथे वैद्य म्हणून कार्यरत होते. मात्र जोधपूर आश्रमातून एका सेविकेने आसारामवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला. या घटनेनंतर अमृत प्रजापती यांनी पहिल्यांदा आसाराम आणि नारायण साई यांच्यावर गंभीर आरोप केले. आसाराम माझ्याकडून अनेकदा सेक्सवर्धक औषधे घेत होते असेही अमृत म्हणाले. अखेर अमृत यांची आश्रमातून हकालपट्टी झाली.
प्रजापती यांनी लैंगिक शोषण प्रकरणात आसारामविरुद्ध जबानी दिली होती त्यामुळेच आसारामला तुरुंगात धाडण्यात आल्यानंतर अमृत प्रजापती यांना अनेक धमक्याही दिल्या जात होत्या. तर आसारामच्या विरुद्ध साक्ष देणाऱ्या आणखी एक साक्षीदार दिनेश चंदभाई यांच्यावर काही अज्ञात इसमांनी अॅसिड हल्लाही केला होता. अमृत प्रजापती यांनी, आसाराम अफूचं सेवन करत होते तसंच आपण आसारामला अनेकदा मुलींसोबत अश्लील चाळे करताना पाहिलं असल्याचं म्हटलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.