`बापूं`च्या शिष्यांचंही `खळ्ळ खट्यॅक`!

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या अटकेनंतर देशभरात त्यांच्या समर्थकांनी थयथयाट केला. बापूंचे भक्त म्हणवणारे हे दंगेखोर अक्षरशः बिथरल्यासारखे वागत होते. अहिंसेची शिकवण देणा-या बापूंच्या शिष्यांवर काय त-हेचे संस्कार झालेत, यावर एक दृष्टिक्षेप...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 2, 2013, 05:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या अटकेनंतर देशभरात त्यांच्या समर्थकांनी थयथयाट केला. बापूंचे भक्त म्हणवणारे हे दंगेखोर अक्षरशः बिथरल्यासारखे वागत होते. अहिंसेची शिकवण देणा-या बापूंच्या शिष्यांवर काय त-हेचे संस्कार झालेत, यावर एक दृष्टिक्षेप...
रास्ता रोको... रेल रोको... खळ्ळ खटॅक ही तर राजकीय पक्षांची मक्तेदारी... दुस-याची भूमिका पटली नाही तर मुद्यावरून थेट गुद्यावर येणं ही झाली राजकीय संस्कृती... परंतु स्वतःला संत म्हणवणा-या आसाराम बापूंचे समर्थकही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वागू लागलेत. एरव्ही अहिंसेवर प्रवचने देणा-या आसाराम बापूंच्या अटकेनंतर त्यांच्या शिष्यांनी हिंसेचा मार्ग पत्करला. देशभरात ठिकठिकाणी रास्ता रोको केला, रेल रोको केला. एवढेच काय, तर पोलीस आणि मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाणही केली. मुंबईत सायन आणि उल्हासनगरमध्ये रविवारी रेल रोको करण्यात आला. आसाराम भक्तांच्या या हिंसेमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. चेंबूर भागात आसाराम समर्थकांनी केलेल्या आंदोलनामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम झाले.
आपल्या प्रवचनांमधून लोकांना सन्मार्ग दाखवणा-या आसाराम बापूंची हीच काय आपल्या भक्तांना दिलेली शिकवण? खरे तर बंद पुकारणे, आंदोलने करणे ही आजवर शिवसेना, मनसे यासारख्या राजकीय पक्षांची मक्तेदारी होती. पण आता बापूंचे भक्तही याच राजमार्गाने चाललेले दिसतात. राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना `खळ्ळ.. खटॅक`चा राजमंत्र दिला. बहुतेक आसाराम बापूंच्या भक्तांनीही आता राजमंत्राचीच दीक्षा घेतलेली दिसतेय. आता जर आध्यात्मिक गुरूचे समर्थकच हिंसक आंदोलने करणार असतील तर शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी करायचे काय, असा सवाल निर्माण होतो...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.