नवी दिल्ली : भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी बीफच्या मुद्द्यावर बोलायला नकार दिला आहे. 'बीफवर बोललो तर माझी नोकरी जाईल' असे म्हणत त्यांनी गोमांस बंदीवर बोलायला नकार दिला आहे.
काहीच दिवसांपूर्वी सुब्रमण्यम यांनी सामाजिक तेढ देशाच्या आर्थिक प्रगतीच्या आड येत आहे, अशा आशयाचं वक्तव्य केले होते. त्यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर, 'मी जर बीफवरील प्रश्नाचे उत्तर दिले तर माझी नोकरी जाऊ शकते. पण, हा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
खरं तर त्यांना विचारलेला प्रश्न हा गोवंश हत्या बंदी आणि त्याचे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणारे परिणाम याविषयी होता. पण, तरीही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला. पण, त्यांनी दिलेल्या प्रामाणिक उत्तराला उपस्थित पत्रकारांकडून टाळ्या नक्की मिळाल्या.
'समाजात असणाऱ्या दरीचा परिणाम हा त्या समाजाच्या आर्थिक विकासाच्या आड येतो. भारत हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आरक्षणाने काय केले, काय केले नाही, धार्मिक प्रश्नांनी काय केले, काय केले नाही, या सर्वांचा परिणाम समाजाच्या जडणघडणीवर होत असतो,' असं सुब्रमण्यम बंगळुरूमध्ये म्हणाले होते.
दादरीत अखलाक या व्यक्तीच्या झालेल्या हत्येनंतर गोमांसाच्या प्रश्नाने देशभरात रान पेटवले होते. आजही अनेक चर्चांमध्ये या विषयाची चर्चा केली जाते. त्या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते.