www.24taas.com, नवी दिल्ली
टीम अण्णातील माजी सदस्य स्वामी अग्निवेश यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिलीय. एका न्यूज चॅनलशी बोलताना, उपोषणादरम्यान अण्णा हजारेंचा मृत्यू व्हावा, जेणेकरून त्याचा फायदा आंदोलनाला मिळू शकेल... अशीच अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती, असं विधान स्वामी अग्निवेश यांनी केलंय.
आपल्याशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी, अण्णांचं बलिदान आंदोलनासाठी फायदेशीर सिद्ध होईल असं म्हटलं होतं, असं अग्निवेश यांनी म्हटलंय. पण, स्वामी अग्विवेश यांच्या विधानावर अविश्वास व्यक्त करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीए. त्याचं कारण म्हणजे आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच असलेलं केजरीवाल आणि अग्निवेश यांचे मतभेद...
अग्निवेश यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २०११ मध्ये जेव्हा जंतर-मंतरवर जन लोकपाल आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी स्वत: अण्णांना उपोषणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ‘पण, नंतर अण्णा आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत असं समजल्यानंतर मी केजरीवाल यांना प्रश्न केला की, अण्णांसारखा वयोवृद्ध व्यक्ती उपोषणाला का बसतोय? यावर अरविंद केजरीवाल यांचं उत्तर होतं की, जर या उपोषणात अण्णांचं बलिदान गेलं तर त्यामुळे क्रांती होईल. या आंदोलनात त्यांचा प्राण गेला तरी हरकत नाही, आंदोलनासाठी ती चांगलीच गोष्ट ठरेल’.
अग्निवेश यांच्या म्हणण्यानुसार ‘जंतर-मंतरवर उपोषणादरम्यान सरकारनं सगळ्या मागण्या पूर्ण केल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांनी अण्णांना आणखी पाच-सात दिवस उपोषणासाठी उकसावत राहिले. ‘आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच केजरीवाल यांना खूप मोठी महत्त्वकांक्षी होती. अण्णांच्या खांद्यावर बंदून ठेवून आपल्याला वार करता येईल, याची त्यांना पूरेपूर जाण होती. अण्णांची लोकांत असलेल्या प्रतिमेचा फायदा घेऊन आपली इमेजही त्यांना बनवायची होती. आणि त्याचमुळे त्यांनी अण्णांना उपोषणाला बसण्यासाठी भाग पाडलं.’ शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अण्णांना उपोषण सोडण्याचा आग्रह केला, पण अण्णा तयार झाले नाहीत. अखेर आम्ही पत्रकार परिषद घेऊन पोल-खोल करू अशी तंबी दिल्यानंतर अण्णांनी उपोषण सोडले, असं अग्निवेश यांनी म्हटलंय.