पाकिस्तानकडून ‘ग्वादर बंदर’ चीनकडे सुपूर्द

हरमुज खाडीवरून जाणाऱ्या जहाजांच्या रस्त्यावर लागणाऱ्या ग्वादर बंदराच्या व्यवस्थापनाचा ताप पाकिस्ताननं चीनकडे सोपवलाय. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्ताननं उचललेलं हे पाऊल भारतासाठी धोकादायक ठरू शकतं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 19, 2013, 12:17 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
हरमुज खाडीवरून जाणाऱ्या जहाजांच्या रस्त्यावर लागणाऱ्या ग्वादर बंदराच्या व्यवस्थापनाचा ताप पाकिस्ताननं चीनकडे सोपवलाय. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्ताननं उचललेलं हे पाऊल भारतासाठी धोकादायक ठरू शकतं.
भारताच्या शेजारच्या देशाच्या हद्दीतील बंदरावर चीननं लक्ष ठेवणं भारतासाठी चिंताजनक आहे, असं भारताचे सुरक्षा मंत्री ए. के. अँटनी यांनी ६ फेब्रुवारी स्पष्टपणे म्हटलं होतं. ग्वादर बंदराचं काम पूर्ण झाल्यानंतर चीनची नौसेना त्याचा वापर करू शकणार आहे आणि हीच गोष्ट भारतासाठी धोकादायक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अरबी समुद्रस्थित ग्वादर बंदराच्या विकासासाठी तब्बल २४ करोड ८० लाख डॉलर्सचा खर्च येणार आहे. आणि यापैकी ८० टक्के खर्च चीनकडून केला जातोय. या क्षेत्रात पाकिस्तानपासून पश्चिम चीनपर्यंत ऊर्जा तसंच आखाती देशांसोबत व्यापारासाठी दरवाजे खुले केले जाणार आहेत.
ग्वादर बंदराचं चीनसाठी विशेष महत्त्व आहे. कारण, चीनमध्ये ६० टक्के तेल जवळच्या आखाती देशांतून येतं. चीननं या बंदराच्या निर्माणासाठी सुरुवातीलाच ७५ टक्के राशी उपलब्ध करून दिली होती.

पाकिस्ताननं ३० जानेवारी रोजी ग्वादर बंदराच्या नियोजनचा अधिकार सिंगापूरकडून काढून घेऊन चीनकडे हस्तांतरित केलाय. हे बंदर अरबी समुद्र आणि फारसच्या खाडीच्या दृष्टीतून महत्त्वपूर्ण आहे. तसंच हे बंदर वैश्विक तेल पुरवठा करणाऱ्या आणि सगळ्यात व्यस्त समजल्या जाणाऱ्या हामरुज जल डमरु मार्गापासून जवळजवळ ४०० किलोमीटर अंतरावर आहे.
महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, चीननं भारताच्या शेजारील देशात म्हणजेच श्रीलंकेच्या हंबनटोटा आणि बांग्लादेशच्या चटगावमध्येही बंदरांच्या निर्मितीसाठी आर्थिक रसद पुरवलीय.