भारतीय बनावटीची 'धनुष' सैन्यदलात सामील होणार

तब्बल ३० वर्षाच्या कालखंडानंतर धनुष नावाची तोफ तीसुद्धा पूर्णपणे भारतीय बनावटीची सैन्यदलात दाखल होण्यासाठी सज्ज झालीय.

Updated: Apr 15, 2016, 08:21 AM IST
भारतीय बनावटीची 'धनुष' सैन्यदलात सामील होणार  title=

मुंबई : तब्बल ३० वर्षाच्या कालखंडानंतर धनुष नावाची तोफ तीसुद्धा पूर्णपणे भारतीय बनावटीची सैन्यदलात दाखल होण्यासाठी सज्ज झालीय.

ऑर्डनन्स फैक्टरी बोर्डने या अत्याधुनिक तोफा बनवल्या आहेत. बोफोर्स तोफांशी साधर्म्य असलेल्या मात्र अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या तीन धनुष तोफा येत्या २० मे रोजी लष्कराकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत.

यानंतर काही किरकोळ चाचण्यांनंतर काही दिवसांतच धनुष तोफ लष्कराच्या तोफखान्यात दाखल केली जाईल. या तोफेच्या नियमित उत्पादनाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलीय.

संपणार तोफांचा दुष्काळ

पहिल्या टप्प्यात १०० पेक्षा जास्त तोफा लष्करात दाखल केल्या जाणार आहेत. १९८० च्या दशकांत बोफोर्स घोटाळा झाल्यानंतर त्या दर्जाची एकही नवीन तोफ लष्करात दाखल झाली नव्हती.

धनुष तोफेची ४० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता आहे. या तोफेच्या समावेशामुळे लष्कराच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. लष्करांतील तोफांचा दुष्काळ संपणार आहे.