बरेली : आध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार कृपाल सिंहवर शुक्रवारी रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आलंय. या खटल्यातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत हल्ला झाला असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला.
अज्ञात हल्लेखोरांनी पळून जाण्यापूर्वी त्यांना आसारामबापू विरोधात साक्ष न देण्याची धमकीही दिली. पोलिसांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार शाहजहापूर इथल्या गदियाना चुंगी परिसरात राहणारे ३५ वर्षीय कृपालसिंग शुक्रवारी रात्री ८.१५ वाजेदरम्यान मोटरसायकलवरून घरी परत जात होते. दरम्यान, रस्त्यात इमली मार्गावर मोटारसायकलस्वार दोन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
सिंग हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कर्मचारी होते. या कंपनीच्या मालकाच्या मुलीनं आसारामबापूनं २०१३ साली राजस्थानाच्या जोधपूर इथल्या त्यांच्या आश्रमात आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या कृपालसिंग यांचं तीन महिन्यांपूर्वीच बयाण नोंदविण्यात आलं होतं. गोळीबारानंतर ते गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान बरेली इथल्या खासगी रुग्णालयात रात्री उशिरा अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष दिलेल्या बयाणात आसारामबापूचे गुंडे शहाजहापूर इथले संजय, अझरुन आणि राघव हे आपल्याला धमकी देत होते आणि या गोळीबारात त्यांचाच हात असू शकतो, असा आरोप कृपालसिंग यांनी मृत्यूपूर्वी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.